सुलभ योग साधना
              योगनिद्रा
 
 
योगनिद्रा कोणी करावी ?
                   ज्याला आपले व्यवहारिक व आध्यात्मिक जीवन अधिक उन्नत, यशस्वी व समृद्ध व्हावे वाटते त्या प्रत्येकाने योगनिद्रा जरूर करावी. कारण आपले जीवन असे बनविणे हे योगनिद्रेमुळे आता तितके अवघड राहिलेले नाही.

                   आपण कोणत्याही धर्माचे, जातीचे, संप्रदायाचे अथवा गुरु महाराजांचे अनुयायी असा, बाल वा वृद्ध असा, स्त्री वा पुरुष असा, विध्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, वकील, नोकरदार, व्यग्र व्यावसायिक, लेखक, राजकारणी, कलाकार, अभिनेते, रोगी- निरोगी, गरीब - श्रीमंत, कोणीही असा , आपण योगनिद्रा करू शकता. स्त्रिया रजस्वला असल्या तरी, म्हणजे मासिक पाळीचे वेळी सुद्धा योगनिद्रा करू शकतात. हि एकच साधना अशी आहे कि ती कोणीही करू शकतो.

योगनिद्रेचे लाभ !
                   योगनिद्रेसाठी अवयव ध्यान करतांना प्रत्येक अवयवांवर पूर्ण ध्यान दिल्याने त्या त्या अवयवात आवश्यक तेवढ्या प्रमाणात रक्त वाहून त्या त्या अवयवामध्ये जी काही अनियमितता असेल, रोग असतील ते आपोआप नाहीसे होऊ लागतात. शेवटी काही दिवसांनी शरीर पूर्ण निरोगी व प्रकृतिस्थ होते. योगनिद्रेने आम्लविकार, मधुमेह, रक्तदाब (उच्च व कमी ), हृदयरोग, मूत्रविकार, यकृतविकार, मेंदूचे विकार, मस्तकपीडा, स्मृती नाश, अति खाणे, निद्रानाश, अतिनिद्रा, थकवा येणे, मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता, बुद्धीशी संबंधित मूढता, विस्मरण, क्रोध, चिडचिड, घबराट, चांचल्य, स्थूलता आदी विकार नष्ट होऊ शकतात. अवयव ध्यान करतांना मुलाधारानंतर स्वदिष्ठानचक्रावर ( जे जननेंद्रियाच्या स्थानी असते ) लिंग शैथिल्य वा नपुंसकत्व असणार्यांनी अधिक काळ ध्यान केल्यास त्यांना योग्य तो शारीरिक लाभ मिळू शकेल. मात्र साधना अधिक काळ करावी लागेल. इतरांनी मात्र स्वाधिष्ठान चक्र वगळावे. काही जणांना असा अनुभव आहे कि त्यामुळे मैथुनेछा वाढते व साधनेचा जो मूळ हेतू - भौतिक, शारीरिक लाभ नसून परमार्थ प्राप्ती आहे, तोच साध्य होत नाही म्हणून साधारण साधकाने असल्या भौतिकतेच्या नादी लागू नये. योगनिद्रेने निद्रा कमी होते, आहार कमी होतो, इच्छा कमी होतात. खूप तरतरी राहते शरीरामध्ये. दिवसभर शरीर चैतन्यमय राहते, झोप कमी झाल्याने काम करण्यास वा साधना करण्यास जास्त वेळ मिळतो. आहार कमी झाल्याने शरीर प्रमाणबध्द व निरोगी राहते व अवाजवी इच्छा कमी झाल्याने मनाची शांती व समाधान वाढून माणूस एका आगळ्याच आनंदात सतत राहू लागतो.
भौतिक लाभ !
                     मन शांत, समाधानी व मजबूत होते. दुबळ्या मनामुळेच बरेचसे त्रास आणि समस्या निर्माण होतात. मनःशक्ती प्राप्त झाल्याने कार्यक्षमता वाढते. तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होते. मन शांत व मजबूत झाल्याने माणूस व्यसनी असल्यास पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकतो. त्यासाठी त्याला वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. जाती व धर्माच्या संकुचित भावना नष्ट होतात व मन विशाल बनते. कांही साधकांचा असा अनुभव आहे कि पुढे येणा-या आपत्तीची आगाऊ चाहूल लागते किंवा नकळत आपत्ती टळते. हे झाले शारीरिक, मानसिक व भौतिक लाभ.
अध्यात्मिक लाभ !
                     योगनिद्रेच्या अभ्यासाने मी जडशरीर नाही, जडशरीराच्या पलीकडील चैतन्य, निष्कल असा मी आत्मा आहे अशी मनाची निश्चिती होते. योगनिद्रेच्या अभ्यासाबरोबरच प्राणायामाचा अभ्यास करून केवळ कुंभक साधल्यास शवासन साधू शकते व जीवात्मा शरीराबाहेर पडून स्वतःचे शरीर स्वतः पाहता येते. शरीराच्या मायेपासून पूर्णपणे मुक्त होता येते व पुन्हा शरीरात आल्यानंतर आता तो अमुलाग्र नवीन व अविचलित असा खरा साधक बनतो. ( मात्र ही शवासन साधना सुयोग्य - ज्यांनी स्वतः अनुभव घेतला आहे, अशा माणसाच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये. ) कुंडलिनी जागृती होते व आत्मज्ञान प्राप्ती होऊन साधक योगी बनतो. स्वतः राम व कृष्ण बनतो.
योगनिद्रा कधी व कशी करावी ?
                      प्रथम इष्टदेवतेचे वा गुरूंचे ध्यान करून प्रार्थना करावी. नंतर षट्चक्रभेदन करून मग योगनिद्रा करावी योगनिद्रा रिकाम्या पोटीच करावी. जेवण, खाणे वगैरे काही झाल्यावर किमान ३-४ तास योगनिद्रा करू नये. त्यासाठी सकाळी उठल्यावर अथवा पहिल्या झोपेनंतर उठल्यावर शौचमुखमार्जन करून चहापाणी न घेता करावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी झोपतांना करावी. ( मात्र झोपण्याआधी ३-४ तास काही खाऊ नये.) योगनिद्रा करून झोपल्यास २-३ तास झोप पुरते व पहाटेची शांत वेळ साधना करण्यास, अभ्यास करण्यास वापरता येते. ज्यांना व्यग्रतेमुळे वेळ अपुरा पडतो त्यांचेसाठी योगनिद्रा हे एक वरदानच आहे.
                      योगनिद्रेसाठी शक्यतो सतरंजीवर धूतवस्त्र टाकून झोपावे. आजारी माणसांनी मऊ गादीवर झोपण्यास हरकत नाही. थंडीचे दिवसात जाड राजईवर झोपण्यास व पातळ चादर पांघरण्यास हरकत नाही. मात्र अंथरुणाची लांबी रुंदी इतकी असावी कि योगनिद्रा करतांना शरीराचा कोणताही भाग अंथरुणाबाहेर जाणार नाही. डोक्याखाली उशी घेऊ नये, अन्यथा अवयव ध्यान करतांना मस्तकावरील ध्यानाचे वेळेस रक्तप्रवाह संतुलित होण्यात फरक पडू शकतो. सुरवातीला आपले आपण अवयवध्यान करण्याचा प्रयत्न केल्यास सलगपणा राहत नाही. मधेच मनात निरनिराळे विचार चालू होतात. पण ते लक्षात आल्यावर पुन्हा मनाला अवयवध्यानाकडे वळवावे. हे लवकर जमावे म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी योगनिद्रेची सी.डी. लावून त्यात सांगितल्याप्रमाणे अवयवध्यान करावे. मात्र स्वतः रेकॉर्डिंग बरोबर तोंडाने श्लोक म्हणू नयेत. फक्त ऐकावे व त्यानुसार ध्यान करावे. याने योगनिद्रा लवकर साधू शकते व मन इकडे तिकडे भटकत नाही. काही काळानंतर एकदा योगनिद्रा साधू लागली कि सी.डी  लावण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र हा काळ ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कमी जास्त असू शकतो.
                      योगनिद्रेसाठी अवयव ध्यान करून मस्तकापर्यंत आल्यावर किंवा त्यापूर्वी कांही दिवसांच्या अभ्यासानंतर योगनिद्रा लागते. त्यानंतर उठतांना आधी हातापायाची बोटे हलवून हळू हळू डावीकडे वळून उठून बसावे. हि क्रिया अत्यंत सावकाश करावी अन्यथा ताण पडतो व योगनिद्रेचे लाभ लवकर मिळत नाहीत. जर योगनिद्रा लागली व स्वतःहून उठायचे भान येण्यापूर्वी आपल्याला लोकांना काही कारणाने उठविण्याची आवश्यकता वाटली तरी त्यांनी शरीराला स्पर्श करू नये अशी सूचना आधी देऊन ठेवावी, केवळ हाका मारून जाग न आल्यास उठविणाऱ्या व्यक्तीने इष्टदेवतेचे वा गुरूंचे स्मरण करून इतर शरीराला स्पर्श न करता हाताच्या बोटाने भ्रू-मध्यावर ( दोन्ही भुवयांच्या मध्ये ) हळू आघात करावा असे सांगून ठेवावे. यामुळे योगनिद्रेतून जाग येउन आपण उठून बसाल व योगनिद्रेची लाभहानी होणार नाही.
योगनिद्रा लागली हे कसे ओळखावे ?
                     जीवात्मा जागृत आणि शरीर झोपलेले याला योगनिद्रा म्हणतात. अशी अवस्था आली आहे हे योगनिद्रा करणाऱ्यास स्वतः समजू शकते. आपले शरीर झोपल्याने होणारे घोरणे आपण स्वतः ऐकू शकतो. असे झाले म्हणेज शरीर झोपले व आपण जागे अशी अवस्था आली असे समजावे. म्हणजेच योगनिद्रा लागली हे ओळखावे. हि अवस्था येण्यास प्रत्येकाच्या क्षमतेनुसार कमी अधिक वेळ लागू शकतो मात्र इतर साधनांमुळे येणाऱ्या अनुभवांपेक्षा हा अनुभव तुलनेने लवकर व निश्चितपणे येतो असा सर्वांचा अनुभव आहे.
योगनिद्रा किती दिवस करावी ?
                    या साधनेने शरीर व मन पूर्ण निरोगी होत असल्याने ज्याच्या त्याच्या शरीर व मनाच्या अवस्थेनुसार यास वेळ लागेल. पण आवश्यक तो लाभ झाल्यानंतर तो लाभ कायम टिकविण्यासाठी हि साधना रोज करीत राहणे आवश्यक आहे. थोडक्यात हि साधना म्हणजे तात्पुरता करण्याचा उपाय नसून अवलंबन करण्याची जीवनप्रणालीच आहे हे लक्षात ठेवावे.
                  योगनिद्रा म्हणजे योग्यांची निद्रा, याला कोणी शवासन म्हणतात, परंतु ते चुकीचे आहे. शावासानामध्ये श्रेष्ठ योगी आपल्या शरीरातून बाहेर निघून आपलेच शव आपल्या दिव्य डोळ्यांनी स्वतःच पाहू शकतो. योगनिद्रा करतांना अवयव ध्यान केले जाते. अवयव ध्यानाने साधक अशा निद्रेत जातो कि साधकाचे शरीर तर निद्रावश होते परंतु साधकाचा जीवात्मा जागृत असतो. यालाच योगनिद्रा असे म्हणतात.
                  आपल्या शरीरामध्ये बरेच अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवावर ध्यान केंद्रित करून व नंतर त्यावरून ध्यान काढून दुसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करणे, परत त्यावरून ध्यान काढून तिसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करणे. याप्रमाणे प्रथम उजव्या पायाचे सर्व अवयव नंतर डाव्या पायाचे सर्व अवयव, त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्यापासून खंद्यापर्यंतचे सर्व अवयव, तसेच डाव्या हाताचे सर्व अवयव, त्यानंतर मुख्य शरीराचे ( धडाचे ) सर्व अवयवांवर एकानंतर दुसरा अवयव असे ध्यान करून शेवटी  'सहस्त्रार' चक्रावर म्हणजेच मस्तकाच्या मधोमध ध्यान केंद्रित करून त्यामध्येच ध्यानमग्न होऊन जायचे आहे. या प्रमाणे अवयव ध्यान करून साधक अशा निद्रेत जातो कि जिथे साधकाचे शरीर झोपलेले असते परंतु साधकाचा जीवात्मा सदैव जागृत आणि सतर्क असतो.
योगनिद्रेसाठी आसन !
                  अवयव ध्यान करण्याकरता प्रथम जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पांढरे स्वच्छ धूत वस्त्र टाकावे. पाठीवर उताणे झोपावे. पायांच्या टाचा जोडलेल्या व बोटे दूर, दोन्ही हात मांड्यांना चिकटलेले परंतु तळहात वर वळविलेले, डोके सरळ ठेवावे किंवा डावीकडे वा उजवीकडे कलते ठेवावे.  नंतर पूर्ण शरीर सैल सोडावे, शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण ठेऊ नये. अशाप्रकारे शरीर सैल, शिथिल सोडून जमिनीवर झोपणे हे योगनिद्रेचे आसन आहे. त्यानंतर अवयवध्यान सुरु करावे. मनात अन्य कुठलेही विचार येणार नाहीत असा प्रयत्न करावा.
अवयवांची नावे -  अवयवांची नावे या प्रमाणे आहेत.

उजवा पाय :- उजव्या पायाचा अंगठा, तर्जनी ( अंगठ्या जवळचे बोट ), मध्यमा ( मधले बोट ), अनामिका, कनिष्ठिका (करंगळी), उजवा तळपाय, उजवी टाच, उजवा घोटा, उजवी पिंढरी, उजवा गुढगा, उजवी मांडी, उजवी कंबर.
डावा पाय :- उजव्या पायाप्रमाणेच अंगठ्यापासून क्रमवार डाव्या कंबरेपर्यंत.
उजवा हात :- उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठिका, उजवा तळहात, उजवे मनगट, उजवे प्रकोष्ठ, उजवे कोपर, उजवा बाहू (दंड), उजवा खांदा.
डावा हात :- डाव्या हाताच्या अंगठा पासून डाव्या खांद्यापर्यंतचे उजव्या हाताप्रमाणेच सर्व अवयव.

मुख्य शरीर (धड) :- मूलाधार चक्र, नभी, उदर (पोट), हृदय, उजवी छाती, डावी छाती, कंठ, हनुवटी, मुख, नाक, उजवा गाल, डावा गाल, उजवा कान, डावा कान, उजवा डोळा, डावा डोळा, भ्रूमध्य, कपाळ आणि शेवटी सहस्त्रार (जन्मलेल्या लहान मुलाला डोक्याला जिथे हाड नसते तो भाग.)
 
  Designed by Prathamesh Katwe.