सुलभ योग साधना
                        योगी मनोहर :- व्यक्ती आणि कार्य
 

                विश्वयोगी परमपूज्य योगीराज मनोहर हरकरे (उर्फ पूज्य काकाजी) हे नाव अध्यात्मिक क्षेत्रात आता सर्वश्रुत झाले आहे. उच्च विद्या विभूषित (बी.ए , बी.एस.सी, एम.ए.संगीत, बैचलर ऑफ फाईन आर्ट्स, डॉक्टर ऑफ सायन्स ) अशा या योगीश्रेष्ठांना संत ज्ञानेश्वर माउलींच्या कृपेने निर्विकल्प समाधी अवस्थेपर्यंतचे सर्व दिव्यानुभव प्राप्त झालेले होते.

                 विश्व उन्नयन संस्थेतर्फे त्यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' आणि 'महापुरुष' अशा पदव्या बहाल करण्यात आल्या होत्या. प्रसिद्धी पराड्मुख अशा पूज्य काकाजींना विविध पदव्या किंवा पुरस्कार यांचे आकर्षण कधीच नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्व व त्यांचे कार्य यापेक्षा कितीतरी महान आहे.

                नागपूरजवळील पवनी या गावी वैनगंगेच्या काठी त्यांनी ९ वर्षे कठोर साधना केली. या कठोर साधनेतून जे ज्ञान त्यांनी प्राप्त केले ते स्वतःपुरते मर्यादित न ठेवता 'वैदिक विश्व' या संस्थे द्वारे जन सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सुमारे ४० वर्षांपासून सुरु केले. 'वैदिक विश्व' हि केवळ एक संस्था नसून संपूर्ण विश्वात वैदिक ज्ञानाचा प्रसार करण्याचे हे एक महान कार्य आहे

                 पूज्य काकाजींचे मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली या भाषांवर प्रभुत्व होते. या सर्व भाषांमध्ये त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. ते स्वतः उत्कृष्ट चित्रकार व गायक होते. आयुष्यात त्यांनी फक्त संगीत साधना केली असती तर हिंदुस्थानातील सर्वोत्कृष्ट गायक म्हणून ते गणले गेले असते. चित्रपट, संगीत, राजनीती, इ. क्षेत्रातील अनेक मान्यवर हस्तींनी त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. (सर्वश्री बी.डी.जत्ती, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक, गुलझारीलाल नंदा, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी इ.) पूज्य काकाजी गुरूजी गोळवलकर व महात्मा गांधी यांना आपले आदर्श मानत आणि या महान व्यक्तींबरोबर काही काळ त्यांनी कार्य सुध्दा केले होते. पूज्य काकाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पहिल्या काही मान्यवर व्यक्तींपैकी एक होते. पूर्वांचलातील चार प्रांताचे प्रमुखपद त्यांचेकडे होते.

                  १९७० सालापासून संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी 'वैदिक विश्व' चे कार्याचा विस्तार केला. ठीकठिकाणी त्यांची व्याख्याने, योगसाधना वर्ग व निवासी शिबिरे आयोजित केली गेली. साधना वर्गात प्रामुख्याने आसने, प्राणायाम, ओंकार- षट्चक्रभेदन व योगनिद्रा यांचा समावेश असे. योगशास्त्रावर त्यांचे संपूर्ण प्रभुत्व असल्याने आजच्या वैज्ञानिक भाषेत ते योगानुभावांचा अर्थ समजावून सांगत असत. रामायण, महाभारत, भागवत इ. महाकाव्ये केवळ जड इतिहास नसून त्यात योगमार्गातील जटील अनुभवांचे व सत्याचे प्रतिपादन रूपकात्मक काव्याद्वारे केले आहे. सुयोग्य प्रयत्नाने त्याचा प्रत्यक्ष अनुभव कोणीही घेऊ शकतो हे सत्यकथन ते स्वानुभवाचे आधारे करीत. पूज्य काकाजींचे योगमार्गात इतके प्रभुत्व असतानाही राहणी अत्यंत साधी होती. आपल्या साऱ्या अनुभवांचे अधिकारपद अत्यंत विनयाने ते ज्ञानेश्वर माउलींवर सोपवित.

                   या वैदिक ज्ञानपरंपरेच्या प्रसाराकरिता भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, उत्तरप्रदेश, बंगाल, दिल्ली आदी राज्यांमध्ये तसेच ऑस्ट्रेलीया, इंडोनेशिया, थायलंड, अमेरिका इ.देशांमध्ये आज शाखा कार्यरत आहेत. देश-विदेशात परमपूज्य काकाजींचे अथक परिश्रमाने कार्य जोमाने चालू आहे व अनेक साधक कार्याची धुरा समर्थपणे सांभाळीत आहेत.

                   ९० वर्षांचे अवघे आयुष्य त्यांनी 'वैदिक विश्व' चे कार्यासाठी झिजवले. पांचही तत्वातील सर्व देव-देवतांची साकार आणि निराकार दर्शने त्यांनी प्राप्त केली होती. अनेक महापुरुष अशा अवस्थांमधून जात असताना देहत्याग करतात. परंतु परमपूज्य काकाजींनी एवढ्या दिव्य अवस्थांमधून जाऊनही ९० वर्षापर्यंत कार्यासाठी आपले शरीरशकट टिकवले. परंतु असे वारंवार होऊ लागल्यास खरे योगी शरीर सोडून निजानंदात मग्न होतात. श्रेष्ठ योगी प्रायोप्रवेशाने देह त्याग करतात. प्रकार व्यक्तिगणिक, विभिन्न राहू शकतो. जसे कि महर्षी व्यास, आद्यशंकराचार्य, ज्ञानेश्वर माउली संत तुकाराम महाराज व पूज्य काकाजी !

                   'वैदिक विश्व' चे कार्याचा वृक्ष असा विस्तारत असतानाच शरीराची ८९ वर्षे पूर्ण करत फाल्गुन शुध्द ३ शके १९२४, गुरुवार ७ मार्च २००३ पहाटे ४ वाजून २२ मिनिटांनी पूज्य काकाजी नागपूर निवासी ब्रम्हलीन झाले.

                    आज अनेक साधक धन्य आहेत ज्यांना पूज्य काकाजींचा प्रत्यक्ष सहवास व मार्गदर्शन मिळाले. पूज्य काकाजींनी दाखवून दिलेल्या मार्गाने जाणे व सांगितलेल्या साधना नित्य करणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. यातच प्रत्येक व्यक्तीचे खरे हित आहे.

                    आजही 'वैदिक विश्व' चे कार्य तेवढ्याच जोमाने चालू आहे. पूज्य काकाजींचे सुपुत्र व जेष्ठ साधक डॉ.दत्ताजी व श्री.त्र्यंबक हरकरे हे दोघेही 'वैदिक विश्व' चे कार्य पुढे नेत आहेत. पूज्य काकाजींचे ज्येष्ठ सुपुत्र श्री.त्र्यंबकजी हरकरे हे योगमार्गात अधिकारी पुरुष आहेत. डॉ.दत्ताजी स्वतः गानयोगातील डॉक्टरेट असून संगीतमय योग साधना वर्ग हे त्यांचे खास वैशिष्ठ्य आहे. याशिवाय ते उत्कृष्ठ चित्रकारही आहेत. त्यांचेच मार्गदर्शनाखाली गावोगावी व्याख्याने संगीतमय कार्यक्रम व योगसाधना वर्ग याद्वारे कार्यक्रम चालू आहे.

                      आजचा समाज अनेक भौतिक सुखात राममाण असूनही आतून प्रचंड अस्वस्थ व व्याधींनी ग्रस्त आहे. आध्यात्माचे नावावर आज ढोंगी व पायघोळ बुवांची खूपच रेलचेल वाढली आहे. संपूर्ण जग एकेकाळी ज्ञानमय वैदिक परंपरामय होते. या विसर पडलेल्या वैदिक परंपरेच्या ज्ञानाचा प्रसार संपूर्ण जगात करण्याचा माउलींचा आदेश सार्थ करण्याचा व त्याद्वारे न थकता विश्वात्मक कार्य पूज्य काकाजींनी ९० वर्षापर्यंत केले व आजही डॉ.दत्ताजी व त्र्यंबकजी यांचे मार्गदर्शनाने कार्य सुरु आहे. अशा या अत्यंत शास्त्रशुद्ध ज्ञानयज्ञात आपणही सहभागी व्हा, इतरांनाही सहभागी करा व खऱ्या अर्थाने अमुल्य असा हा नरदेह सार्थकी लावा. हीच सर्वांना नम्र विनंती.

 
  Designed by Prathamesh Katwe.