सुलभ योग साधना
              षट-चक्रभेदन 
 
 
   
 
प्रक्रिया :-
प्रथम पद्मासन घालून बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. खांदे थोडेसे उचला. मांडीवर डाव्या तळ हातावर उजवा तळ हात ठेवा. आणि ध्यान प्रक्रिया सुरु करा.
१ :- ध्यान करतांना आपल्या शरीरातील जी सात योगचक्रे आहेत त्यावर क्रमाक्रमाने ध्यान लावावे. त्यातील पहिले "मूलाधार चक्र" म्हणजेच        गुदद्वार व जननेंद्रिय या मधील शिवणीवर.
२ :- दुसरे योग चक्र "नाभी स्थान" बेंबी मध्ये.
३ :- तिसरे " हृदयामध्ये" म्हणजेच छातीच्या मधोमध.
४ :- चौथे "कंठ स्थान " कंठामध्ये.
५ :- पाचवे " तालू " म्हणजेच जिभेच्या आतील टोकाच्या वरील भाग.
६ :- सहावे चक्र " भ्रूमध्य" म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मधोमध.
७ :- सातवे चक्र "सहस्त्रार" म्हणजेच मस्तकाच्या अगदी मधोमध लहान मुलाला जन्मल्यावर डोक्याला जिथे हाड नसते तो टाळू चा भाग.
ध्यान प्रक्रिया :-
                   नाकाद्वारे छातीमध्ये पूर्ण श्वास भरून घ्या. नंतर तोंडाने धीर गंभीर आवाजात ॐ  चा नाद करा व त्या नादानुसंधानात प्रथम " मूलाधार" चक्रावर ध्यान केंद्रित करा. ॐ  चा स्वर चालू द्या. ॐ चा नाद करतांना प्रथम तोंडाने "ओ " म्हणावे व श्वास संपतांना मुख बंद करतांना लयबद्ध आवाजात "म" म्हणावा.
                 नंतर परत खूप श्वास घेऊन ॐ चा नाद करून प्रथम मुलाधाराला ध्यानानेच स्पर्श करून "नाभी चक्रावर ध्यान केंद्रित करा. ॐ चा स्वर चालू ठेवा.
                   पुन्हा खूप श्वास घेऊन ॐ चा नाद करून वरील प्रमाणेच प्रथम मूलाधार , नाभी चक्राला ध्यानानेच स्पर्श करून हृदयावर ध्यान केंद्रित करा. ॐ चा स्वर चालू ठेवा.
                     पुन्हा खूप श्वास घेऊन ॐ चा नाद करून वरील प्रमाणेच प्रथम मूलाधार , नाभी, हृदय या चक्रांना ध्यानाने स्पर्श करून कंठावर ध्यान केंद्रित करा. ॐ चा स्वर चालू ठेवा.
                           पुन्हा खूप श्वास घेऊन ॐ चा नाद करून वरील प्रमाणेच प्रथम मूलाधार , नाभी, हृदय,कंठ या चक्रांना ध्यानाने स्पर्श करून तालू चक्रावर ध्यान केंद्रित करा. ॐ चा स्वर चालू ठेवा.
                            पुन्हा खूप श्वास घेऊन ॐ चा नाद करून वरील प्रमाणेच प्रथम मूलाधार , नाभी, हृदय,कंठ, तालू या चक्रांना ध्यानाने स्पर्श करून भ्रूमध्यावर ध्यान केंद्रित करा. ॐ चा स्वर चालू ठेवा.
                            शेवटी वरील प्रमाणेच ॐ च्या नादाबरोबरच मुलाधारापासून भ्रूमध्या पर्यंतच्या प्रत्येक चक्राला ध्यानाने स्पर्श करून सहस्त्रार चक्रावर ध्यान केंद्रित करा.
सहस्त्रार चक्रामध्ये स्थिर होतांना मंत्र पुष्पांजलीचे मनातल्या मनात स्मरण केल्याने ध्यानामध्ये अधिक लाभ होतो.
                   या प्रमाणे ॐ च्या नाद ध्वनी बरोबर ॐ कार षट-चक्रभेदन प्रक्रिया दररोज केल्याने काही काळानंतर साधक खोल ध्यानात जाऊन सर्व ज्ञान प्राप्त करू शकतो अशा प्रकारे ध्यान केल्याने आपोआप ज्ञान प्राप्त होते. पुस्तके वाचून आपणास फक्त माहिती मिळते ज्ञान नाही. या बाबत श्रीमद भगवत गीता म्हणते :
  नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विध्यते ।
  तत् स्वयं योग संसिध्द कालेनात्मनि विदंती ।।
 
  Designed by Prathamesh Katwe.