सुलभ योग साधना
              प्राणायाम
 
 
 
                 वैदिक जीवन अतिशय शास्त्रीय जीवन असल्यामुळे त्यातील व्यवहाराकरिता उपयोगात आणले जाणारे शब्द सुद्धा तसल्याच उच्च शास्त्रीय हेतूने वापरले जात असतात. प्राणायाम हा शब्द सुद्धा तसल्याच उच्च शास्त्रीय ज्ञानाने व्यापला आहे. प्राणावर आयाम म्हणजे संयमाद्वारे अधिक शक्ती वाढविण्याची जी सूक्ष्म प्रक्रिया आहे त्याला वैदिक परंपरेत प्राणायाम असे म्हणतात. सर्व जीवमात्रांत प्राण नावाची एक शक्ती आहे. असली प्राणशक्ती सर्व विश्वात त्या त्या वस्तुमात्रांचे कार्याद्वारे सतत क्रिया करीत असते. प्राणिमात्रांत सतत वसत असलेली प्राणशक्ती विश्वात्मक प्राणशक्तीचा एक अखंड अंश असल्याने त्या प्राणशक्तीवर संयम साधल्यास मानव त्या प्रचंड शक्तीद्वारे सा-या विश्वावर सत्ता गाजवू शकतो. मानवी शरीरात वसत असलेली प्राणशक्ती मानवाचे सततचे श्वासस्पंदनात सुद्धा असल्याने श्वासोच्छ्वासावर संयम साधल्यास शरीरांतर्गत असलेल्या सर्व प्राणशक्तीवर संयम साधला जातो असे वैदिक ऋषीमुनींना आढळून आले. प्राणायामामुळे मन अतिशय स्थिर बनून ते प्रसंगी कणखर बनते असा अनुभव आहे. प्राणायामामुळे चित्ताची एकाग्रता वाढून बुद्धी प्रखर बनते असाही अनुभव आहे.
 
इच्छावर्ती अनिच्छावर्ती स्नायू
                  आपल्या शरीरांतर्गत ज्या अनेक क्रियाप्रक्रिया चालू आहेत त्या दोन प्रकारच्या स्नायूंद्वारे चालू असतात. एक प्रकार च्या स्नायूंना इच्छावर्ती म्हणतात, तर दुसऱ्या प्रकारच्या स्नायूंना अनिच्छावर्ती स्नायू म्हणतात. अनिच्छावर्ती स्नायूंवर आपला ताबा नसतो . उदाहरणार्थ हृदयाचे स्नायू, आतड्यांतील स्नायू, रक्त वाहिन्यांतील स्नायू इत्यादी. इच्छावर्ती स्नायूंवर आपला ताबा असतो जसे हात, पाय , पोट इत्यादी. फुफ्फुसातील स्नायू तसे पाहिल्यास अनिच्छावर्ती असतात परंतु त्यावर प्रयत्नाने संयम साधल्यास ते इच्छावर्ती बनू शकतात म्हणून असल्या दुहेरी कार्य करणाऱ्या श्वास संस्थेवर पूर्ण संयम साधल्यास साधक स्वतः च्या शरीरातील प्राणावर पूर्ण संयम साधून त्याद्वारे विश्वातील अनेक घटनांवर संयम साधून त्याद्वारे अनेक असंभाव्य घटना संभाव्य करू शकतो असा दिव्य अनुभव ऋषीमुनींना आला. प्राण संयम साधल्यास चमत्कारिक घटना घडू शकतात असाही त्यांना अनुभव आला. असल्या अतर्क्य घटनांनाच साधारण माणूस चमत्कार म्हणत असतो. परंतु चमत्कारिक विज्ञान कळल्यास ते चमत्कार नसून साधारण घटना आहेत असे कळू शकेल
 
प्राणायामाचे रहस्य
                    अभ्यासाद्वारे ऋषीमुनींनी प्राणावर संयम साधून त्याद्वारे प्राणशक्तीची धारणा अमर्याद वाढविण्याचे एक शास्त्र शोधून काढले त्यालाच ते प्राणायाम असे म्हणत असत. आज आपल्याला प्राणायामावर विचार करायचा आहे. बेडूक आणि साप यांचे रक्त शीत असल्यामुळे हिवाळ्यांत ते बाहेरील थंडीशी मुकाबला करू शकत नाहीत म्हणून अति शीतकालात बेडूक व साप एखाद्या खोल रंध्रात बसून अत्यंत कमी प्राणवायूत किंवा अनेकवेळी प्राणवायुविरहित आपले जीवन व्यवस्थित चालवू शकतात. मानव अव्याहत श्वास प्रश्वास करून जगत असला तरी प्राणायाम सिद्ध करून तो श्वासाशिवाय अनेक तास नव्हे तर अनेक दिवस राहू शकतो असा अतींद्रिय अनुभव योग्यांना येतो. असल्या श्वासरहित अतीव अवस्थेला महाभारतात "अश्वत्थामा" असे म्हणतात. असला अश्वत्थामा योगी इच्छामरणी असल्यामुळे चिरंजीवी बनू शकतो. म्हणून असल्या अश्वत्थाम्याला भगवान वेदव्यास चिरंजीवी असे संबोधतात. "अश्वत्थामा" कथेत असले दिव्य योगशास्त्र आहे ज्याचा शोध व बोध घेणे प्रत्येक बुद्धिवादी अध्यात्मप्रवण व्यक्तीचे कर्तव्य ठरते. महाभारत व रामायणातील सर्व कथा असल्याच अतींद्रिय अनुभव शास्त्रावर आधारल्या आहेत असे सुज्ञांना दिसून येईल. राम आणि युधिष्ठिराने जो अश्वमेध यज्ञ केला तो असल्याच प्राणायामातील दिव्य अडचणींवर शक्तीसह मात करणे होय, अन्यथा एक निरुपद्रवी अतएव उपकारी अश्वाचा गळा कापून रामाला अथवा धर्मराजाला कोणते मनःस्वास्थ लाभणार होते ? निरुद्ध श्वासाला मोकळे करणे म्हणजे अश्वमेधयज्ञ होय, प्रत्यक्ष घोड्याची समारंभपूर्वक मान कापणे नव्हे.
 
प्राणायामाचे प्रकार, त्यांचा लाभ व सामर्थ्य
                      आज प्रणायामाबद्दल साधारणतः अशी कल्पना दिसते कि श्वासाचा निरोध करून कठीण कठीण साधना करणे कि ज्यामुळे साधना न केल्यास साधक वेडा होऊ शकतो अथवा प्राण सुद्धा गमवू शकतो. परंतु प्रणायामाबद्दलची असली कल्पना योग्य नव्हे. प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक प्राणायाम शारीरिक व मानसिक आरोग्याला अतिशय उपकारक असून त्यामध्ये असाध्य वाटणारे रक्तदाब, हृदयपीडा, मधुमेह, निद्रानाश, वायू प्रकोप, श्वास, मृगी, मानसिक दुर्बलता यासारखे रोग बरे होतात. प्राणायामाचे शेवटचे दोनचार प्रकार मात्र कठीण असून ते जाणणाऱ्या योग्य गुरुचे मार्गदर्शनाशिवाय ते करू नये हे खरे आहे. कठीण प्राणायामाचे प्रकार फलाचे दृष्टीने अतिशय सामार्थशाली असतात. परंतु तसले कठीण प्राणायाम न केल्यास साधारण साधकाचे कोणतेच नुकसान होऊ शकत नाही. आज एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर प्रवास करण्याचा काळ जवळ येत आहे. हवेशिवाय व गुरुत्वाकर्षण शक्तीचे अस्तित्वाशिवाय असणाऱ्या असल्या प्रवासांत प्राणायाम निपुण असणाऱ्या साधकाचा प्रवास इतरांपेक्षा अधिक सुलभ होईल हे नक्की. प्राणायामामुळे मन अतिशय स्थिर बनून ते प्रसंगी कणखर बनते असाही अनुभव आहे. प्राणायामामुळे चित्ताची एकाग्रता वाढून बुद्धी प्रखर बनते असाही अनुभव आहे.
 
  Designed by Prathamesh Katwe.