सुलभ योग साधना
              योगाचे जीवनातील स्थान
 

                   योग म्हटला कि साधारणत: आसनांचीच कल्पना आपल्यासमोर उभी राहते. परंतु आसने योगाचा एक अष्टमांश भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान,धारणा, आणि समाधी ही योगाची अष्ट अंगे होत. या आठ अंगापैकी एक अंग आसने होत. आसनांमुळे शरीर निरोगी आणि दीर्घजीवी बनू शकते. शरीर अत्यंत प्राकृतिक असले म्हणजे त्याचे आधारे असणारे मन सुद्धा तितकेच प्राकृतिक म्हणजे शुद्ध अवस्थेत असू शकते. मन शुद्ध झाल्यास चित्तअवस्था आपोआप उदित होते आणि चित्त शुद्ध असल्यास ज्ञानप्राप्ती होऊन साधक आत्मज्ञानाचे मार्गाला लागतो असा हा मुक्तीचा सोपान आहे.

                   म्हणूनच आसनांचे उद्धिष्ट केवळ शरीरस्वास्थ्य पुरतेच मर्यादित नसून त्याही पलीकडील अनेक उच्च उच्चतर योग अवस्था प्राप्त करणे होय. त्यापैकी आपले प्रयत्नाने काय साधता येईल आणि काय साधेल हा प्रश्न ज्याचे त्याचे क्षमता व रुचीचा आहे. परंतु योगसाधनेची वाटचाल मात्र आत्माज्ञानाकडे असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच आसनांना 'आसन' हे अत्यंत सुयोग्य नाव दिले आहे. 'आ' म्हणजे प्राप्त झालेले सर्व घेऊन 'सन' म्हणजे पलीकडे जाणे होय. पलीकडे कोठे ? तर प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, व शेवटी समाधी अवस्था होय. परंतु या सर्व उच्च उच्चतर अवस्था प्राप्त करण्याकरिता प्रथम सूक्ष्म शरीररूप उपकरणांची अतिशय आवश्यकता असते. शरीराचे माध्यमातून आपण वरील सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो. म्हणून शास्त्र सांगते - ' शरीरं आद्य खलु धर्म साधनम' !

           येथे धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान अथवा ख्रिश्चन न समजता आपल्या आपल्या शरीर, मन व बुद्धीच्या क्षमतेनुसार ज्ञानसाधना करणे होय. उच्च उच्चतर साधना करण्याकरिता प्रथम आपले शरीर तितक्या प्रमाणांत उच्च उच्चतर क्षमतेचे असणे आवश्यक असते. आसने ही ज्ञानसाधनेची प्रथम पायरी होय. सर्वस्व नव्हे. ज्ञानसाधनेत शरीर हे सर्वस्व नसून त्या ज्ञानसाधनेचे एक महत्वाचे उपकरण होय हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

                  शरीरस्वास्थ्य हेच मानवाचे एकमेव ध्येय मानल्यास मानवात आणि पशुंत विशेष अंतर राहणार नाही. कारण पशु क्वचितच आजारी पडतो. परंतु योगसाधनेकरीता शरीर अतिशय शुद्ध म्हणजे निरोगी अवस्थेत असणे आवश्यक असल्यामुळे भक्तियोग अथवा ज्ञानयोग मार्गात शरीर निकोप असणे अत्यावश्यक आहे. असल्या निकोप शरीरांत निकोप मन राहून त्याद्वारे आपोआप मनाची एकाग्रता वाढते. मन एकाग्र झाले म्हणजे चिंतन अथवा ध्यान आपोआप साधते. आजचे युग विज्ञान युग मानले जाते. विज्ञान संशोधनाद्वारे प्रगत होत असते.असली संशोधन करणारे वैज्ञानिकांना आपल्या मनाच्या एकाग्रतेमुळे संशोधन करणे शक्य झाले आहे. सर्व थोर वैज्ञानिक आधुनिक ऋषीच होत.

     आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी अध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञान विज्ञानांतील गहन तत्वे समाजासमोर ठेवीत असत. वेदांमध्ये बरेच ज्ञान विज्ञान साठविले आहे. परंतु दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात. वेदातील सर्व ज्ञानविज्ञान ऋषींनी सखोल चिंतनाद्वारेच प्राप्त केले. आजचे थोर वैज्ञानिक सुद्धा तसल्या सखोल चिंतनाचा उपयोग करून नवनवे शोध लावतात आणि मानवी जीवन सुखी व समृध्द करण्याचा अहोरात्र प्रयत्न करतात. वैज्ञानिकांच्या मनाची एकाग्रता अथवा चिंतनाची क्षमता सर्वांमध्ये जन्मतः असू शकत नाही त्याकरिता आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, इत्यादी योग्य मार्गाने आपण आपल्या मनाची एकाग्रता व सखोल चिंतनाची क्षमता वाढवू शकतो. योगसाधना एक प्रकारचे प्रशिक्षण आहे. आजकाल जीवनाच्या प्रत्येक कक्षेत प्रशिक्षणाचे महत्व वाढत आहे. मनाच्या एकाग्रतेची व सखोल चिंतनाची गुरुकिल्ली ध्यान प्रक्रियेत आहे. ध्यानामुळे मन अतिशय एकाग्र बनत असते. असल्या एकाग्र मनाचा उपयोग आपण आपल्या जीवनातील कोणत्याही कामाकरिता करून त्यात लवकर उन्नत्ती व पूर्णता प्राप्त करू शकतो.

               आसनानंतर थोडे आवश्यक असे प्राणायाम सिद्ध करणे शरीरयोग्य आणि मन संयमाकरिता आवश्यक असते. प्राणायामामुळे मनात विलक्षण संयम येतो. असले संयमित मन अध्यात्मांत अतिशय आवश्यक असते. मन खंबीर नसेल तर व्यवहारांत निर्णय घेऊन त्यातून कुशलतेने मार्ग काढणे असंभव होते हा प्रत्येकाला विशेषतः संकटकाळी अनुभव येतो. खंबीर मनच आपतकाळी तारक ठरते अन्यथा अस्थिर मनाचे धिंडवडे कसे निघतात याचे प्रत्यंतर आपण नित्य पाहत असतो. स्थिर मन आपोआप सिद्ध होत नसते, तर त्याकरिता प्राणायाम आणि ध्यानासारख्या प्रक्रिया अतिशय लाभदायक ठरतात. जी व्यक्ती नेहमी प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास करते तिला प्रसंगी विलक्षण धैर्य प्राप्त होऊन ती त्या प्रसंगातूनही कुशलतेने पार निघून जाते. तेव्हा व्यवहारात यश व धैर्य प्राप्त होण्याकरिता प्राणायाम व ध्यानाची अतिशय आवश्यकता आहे. प्राणायाम व ध्यान धीर मनाचे प्रशिक्षण होय.

                  ध्यानाची सिद्धता तर आणखी वरचढ असते. ध्यानामुळे मनाची एकाग्रता विलक्षण वाढून ते मन ज्या विषयांत एकाग्र केले जाईल तो विषय इतरांपेक्षा फारच कमी वेळात त्या व्यक्तीला साध्य होईल. समजा एक विद्यार्थी आहे. विध्यार्थ्यांना सतत अभ्यास करावा लागतो. बरेच विध्यार्थी सारखे वाचत असतात पण वाचलेले विषय त्यांचे लवकर ध्यानात राहत नाहीत. असल्या विद्यार्थ्यांनी ध्यानाचा अभ्यास केल्यास त्यांनी वाचलेला वा ऐकलेला विषय इतरांपेक्षा लवकर व नेहमी त्यांचे ध्यानात राहील. म्हणून शिक्षकांनी अपेक्षित प्रश्नपत्रिका धुंडाळून त्या विद्यार्थ्यांना सांगून त्यांना कसेतरी उत्तीर्ण करण्याचा आटापिटा न करता विद्यार्थ्यांकरवी ध्यान करवून घेतल्यास अधिक विद्यार्थी अधिकाधिक गुण मिळवू शकतील, असा अनुभव आहे. विषय ध्यानात राहण्यास मनाची एकाग्रता आवश्यक असते. ज्यांचे मन लवकर एकाग्र होऊ शकत नाही त्यांनी ध्यान केल्यास त्यांचे मन कोणत्याही विषयात एकाग्र बनून तो विषय त्यांचे ध्यानांत अधिक लवकर राहील. पूर्वी गुरुकुलांत विध्यार्थ्यांना ध्यानांत अधिक प्रवीण करत असत आणि त्याद्वारे विद्यार्थी कोणत्याही विषयांत लवकर पारंगत होत असे. ध्यानाचा अभ्यास पुनः अधिक प्रमाणात होणे आवश्यक आहे.

समजा एखादा वकील, वा कार्यालयात काम करणारा कारकून वा अधिकारी आहे. त्याचे समोरील फ़ाइल वाचून त्यावर योग्य निर्णय घेण्यास एखाद्या सामान्य माणसाला जर आठ पंधरा दिवस लागतील तर त्याच फ़ाइल चा सुयोग्य अभ्यास करून त्यावर सुयोग्य निर्णय घेण्यास ज्ञानसिद्ध साधकाला साधारण माणसापेक्षा कितीतरी कमी वेळ लागेल. ज्यांचे लिहिण्यावर अनेक व्यक्तींचे भवितव्य अवलंबून असते, असल्या जबाबदारीच्या जागी असलेल्या व्यक्तींना तर अतिशय सावध राहून  निर्णय घ्यावे लागतात. असला माणूस जर ध्यानसाधक असेल तर त्याचेद्वारे सुयोग्य निर्णय घेतले जातील यात शंका नाही. समजा एखादा डॉक्टर आहे. समोर असणाऱ्या रोग्याच्या रोगाचे निदान करतांना त्याचे मन व बुद्धी अतिशय स्वस्थ असणे आवश्यक असते. स्वस्थ मन व बुद्धी नसल्यास रोगाचे निदान करण्यात त्या डॉक्टर ची चूक होऊ शकते आणि परिणामी रोग्याला अधिक त्रास होऊ शकतो. म्हणून सर्वच वैद्य वा डॉक्टर आपल्या धंद्यात हुशार नसतात. त्यातील काही डॉक्टर, वैद्यांचेच हाताला यश असते. आणि याचे कारण म्हणजे सुयोग्य ज्ञान प्राप्त करून त्यावर सुयोग्य निर्णय घेण्याची त्यांची पात्रता होय. ध्यानाचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर वैद्यांना अधिक यश मिळेल हे निश्चित.

साध्या व्यवहारांत सुद्धा ध्यानाच्या सिद्ध अवस्थेचा उपयोग केल्यास किती उत्तम लाभ होऊ शकतो याबद्दल आपण मागील अनुच्छेदात पहिले. ध्यानसिद्ध मनाचा जीवनाच्या आणखी इतर महत्वाच्या कक्षेत असा लाभ होऊ शकतो याबद्दल आणखी बघू. आज सर्वच क्षेत्रात राजकारण पसरले आहे. राजकारण्यांच्या निर्णयामुळे समाजावर बरे वाईट असे खोल परिणाम होत असतात हे आपण पाहतोच. असल्या राजकारण्यांचे मन व बुद्धी संयमित आणि सर्व समाजाचे सुखाकरिता विचार करणारे नसेल तर त्यांचे द्वारे समाजावर विलक्षण आपत्ती ओढविण्याचा प्रसंग येत असतो. तेव्हा राजकारणात रस घेणार्यांना सर्वप्रथम ध्यान साधना सिद्ध करणे आवश्यक असते. ध्यानसिद्ध साधक राजकारणी व्यक्तीद्वारे समाजाचे कल्याणच होते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी होत. मानवांच्या कल्याणाची बुद्धी असल्यामुळेच महात्मा गांधी जागतिक आदर्श बनू शकले. महात्मा गांधी रोज ध्यान व प्रार्थना करीत असत. त्यांची प्रार्थना कोणत्याही विशिष्ट धर्मपंथाची नसल्यामुळे ते अखिल मानवंदना वंदनीय ठरले. राजकारणात ध्यान महत्वाचे ठरावे.

      आजचे जग वैज्ञानिक आहे. साध्या लेखणीपासून तो प्रवासापर्यंतच्या सर्व व्यावहारिक कामात पदोपदी वैज्ञानिक शोधाद्वारे प्राप्त झालेली सुलभ आणि आवश्यक उपकरणे वापरावी लागतात. पूर्वी धूळपाटीवर लिहित असत. आता केवळ बोलण्यावरून आशय अंकित केला जातो. पूर्वी माणूस पायी चालून बैलगाडीवर बसून अथवा घोड्याच्या पाठीवर बसून इतरत्र प्रवास करीत असे. आता माणसाचे दिमतीला स्वयंचलित वाहने, विमानादी उपकरणे आली आहेत. आता तर मानव इतर ग्रहांवर जाऊन तेथील ज्ञान घेत आहे. रोगांचे निदान करण्याकरिता तो अतिशय सूक्ष्म अशा जीव अवस्थांचा शोध घेऊन त्यावर उपाय योजित आहे. असल्या जीवनाला आवश्यक असणार्या सर्व उपकरण अवस्थांचे शोध घेण्यात वैज्ञानिकांना एखाद्या बंद खोलीत स्वतःला कोंडून घेऊन एकाग्र चित्त करावे लागते. असल्या एकाग्र चित्ताद्वारेच नवीन शोध लागत असतात आणि मानवी जीवन सुखी व समृध्द करण्यात त्यांचा उपयोग होत असतो. एखादे संशोधन करण्यास एखाद्या संशोधकास समजा दहा वर्षे अवधी लागत असेल तर ते संशोधन करण्यास ध्यानसिद्ध वैज्ञानिकास कितीतरी कमी अवधी लागेल.

           ध्यानसिद्धी आगाऊ झाल्यास त्या संशोधकांचा बराच वेळ व शक्ती वाचते शिवाय संशोधनाच्या मधल्या पायऱ्यांत घोटाळत न राहता असला ध्यानसिद्ध संशोधक संशोधनाचे चरम अवस्थेप्रत लवकर जाऊ शकतो. अवकाशयानातून प्रवास करणाऱ्या अवकाशयात्रीला बरेच कठीण प्रशिक्षण घावे लागते. अशा प्रशिक्षित अवकाशपटूपैकी काहीजणच अवकाशयानातून प्रवास करू शकतात. सध्या चपराश्यापासून तो वरील अधिकाऱ्यापर्यंत, साध्या शेतकऱ्यापासून तो कृषी संशोधाकापर्यंत, साध्या सुइणीपासुन तो उत्तम डॉक्टरपर्यंत साऱ्यांनाच प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षण म्हणजे आवश्यक तो उत्तम संस्कार व विषयात मन एकाग्र करण्याची किमया होय. हि किमया ध्यानाद्वारे सर्वांनाच सिद्ध होऊ शकते. ध्यानसिद्ध व्यक्ती जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात इतरांपेक्षा लवकर प्रगती करू शकते हा अनुभव आहे म्हणून जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्याकरिता सर्व क्षेत्रांना सामान्य असलेल्या ध्यानाचे प्रशिक्षण सर्वांना असणे आवश्यक आहे. 'ध्यान' योग्याचा गाभा होय. ध्यानामुळे सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते. गीता यावर स्पष्ट सांगते :-

  नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विध्यते
  तत् स्वयं योग संसिध्द कालेनात्मनि विदंती 

योगाचा मानवी जीवनाशी इतका निगडीत संबंध आहे. योगामुळे जीवन अधिक संपन्न, समृद्ध व सुसंस्कृत बनेल हे निश्चित.

 
  Designed by Prathamesh Katwe.